मुंबई : शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मला उद्याच्या निवडणुकीची चिंता नाही. चिंता करत बसलो तर शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमण्यांमध्ये जे भिनवलेलं आहे, त्याचा उपयोग काय? हार-जीत होत असते आणि उद्या तर आपण जिंकणारच आहोत,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
‘महाराष्ट्र पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो’
‘महाराष्ट्र पेटत नाही, मात्र जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो. हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला. सचिन अहिर चांगलं काम करत आहेत. आमशा पाडवी विधानसभा निवडणुकीत १३०० मतांनी पडले. पाडवी हा आदिवासींचा हक्काचा माणूस आहे. तर संपर्कप्रमुख म्हणून सचिन अहिरांचे काम चांगले,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.