यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या अंगावर अनेक किरकोळ लोक सोडले गेले. राणा, बाणा, काणा येऊन गेले, पण शिवसेनेचा स्वाभिमान या सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिला. आज जे पिरपिर, टिरटिर करत फिरत आहेत, ते भविष्यात शिवसेनेच्या पायाशी असतील, अस वातावरण सध्या राज्यात निर्माण होऊ लागल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच भाजपने आम्हाला केंद्रीय सत्तेची मस्ती दाखवू नये. आम्ही ईडी किंवा सीबीआयला घाबरत नाही. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर पायाखाली तुडवू, ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.
‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है’
सध्या राजकारणात काही लोकांना घमेंड आली आहे. राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे आपण महाराष्ट्र आणि जग जिंकले असे त्यांना वाटत आहे. आमच्या राजकीय विरोधकांना मी इतकंच सांगू इच्छितो की, ‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है’,अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्ला चढवला.
संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेवरही कडाडून टीका केली. केंद्राच्या अग्निपथ योजनेमुळे संपूर्ण देश पेटला आहे. केंद्र सरकार आता कंत्राटी पद्धतीने सैन्याची भरती करणार आहे. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणीही घेतला नसेल. वेड्या असलेल्या तुघलक मोहम्मदनेही असा निर्णय घेतला नसता. देशाचे रक्षण कोणी करायचे, हेच केंद्र सरकारला कळत नाही. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही. अग्निपथ योजनेमुळे आज संपूर्ण देश पेटला असताना महाराष्ट्र शांत आहे. कारण, या राज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात स्थैर्य राहील, असेही संजय राऊत यांनी म्हटले.