भुलभूलैय्या २ या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडत असताना अजूनही काही कारणाने ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पहायला जमलं नाही त्यांच्यासाठी गुड न्यूज आली आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याने आता घरी बसून या सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ज्यामुळे हा सिनेमा पाहण्याची इच्छा होती पण वेळ मिळाला नव्हता अशा प्रेक्षकांचा रविवार आता मनोरंजनाने भरणार आहे.फादर्स डेच्या औचित्याने हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला. नेटफिक्सच्या सोशल मीडिया पेजवर ही माहिती देण्यात आल्याने कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचे चाहते बेहद खुश आहेत. भुलभुलैय्या २ या सिनेमाचं पोस्टरही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.
१५ वर्षापूर्वीही या सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्सऑफीसवर चांगली कमाई केली होती. त्या सिनेमात अक्षयकुमार, विदया बालन, शायनी आहुजा, अमिषा पटेल यांच्या भूमिका होत्या. नव्या सीझनमध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी यांच्यासह तब्बूचीही खास भूमिका आहे. रहस्यमय आणि रोमँटिक असलेल्या या सिनेमाने कार्तिकच्या फिल्मी करिअरला हिट तडका दिला आहे.