अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचा १०० वा वाढदिवस १८ जूनला झाला. आईच्या जन्मदिनानिमित्त मोदींनी एक ब्लॉग लिहिला होता. यामध्ये मोदींनी त्यांचे लहानपणीचे मित्र अब्बास यांचा उल्लेख केला होता. वडील दामोदर दास मोदी यांचा एक मित्र मुस्लिम होता. त्यांच्या मृत्यूनंतर वडील त्यांचा मुलगा अब्बासला घरी घेऊन आले. अब्बास मोदींच्या कुटुंबातच वास्तव्याला होता. त्यानं तिथेच शिक्षण घेतलं. आई हिराबेन त्याच्यासाठी ईदला खास स्वयंपाक करायची, अशा आठवणी मोदींनी ब्लॉगमध्ये सांगितल्या होत्या. मोदींचा मित्र अब्बास नेमका आहे तरी कुठे? ते सध्या काय करतात? असे प्रश्न अनेकांना पडले. या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.

अब्बास यांचा उल्लेख आल्यानंतर एक फोटो समोर आला आहे. पंतप्रधान मोदींचे भाऊ पंकजभाईंनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास त्यांच्यासोबत शाळेत शिकायचे. अब्बास यांचं पूर्ण नाव अब्बास मियाँभाई मोमीन असं आहे. अब्बास ज्या गावात राहायचे, तिथे शाळा नव्हती. वडिलांच्या निधनानंचर त्याचं शिक्षण अर्धवट राहू नये, म्हणून आमचे वडील त्यांना आपल्यासोबत घेऊन आले. अब्बास यांनी आमच्यासोबत असताना आठवी आणि नववीचा अभ्यास केल्याची आठवण पंकजभाईंनी सांगितली.
एक लहानसा पक्ष, त्यावर तिघांचं लक्ष; ठाकूरांकडे पुन्हा हुकूमी एक्का, आज कोणाला धक्का?
अब्बास आता ६४ वर्षांचे आहेत. ते गुजरात सरकारमध्ये क्लास-२ चे अधिकारी होते. त्यांनी अन्न आणि पुरवठा विभागात काम केलं. नोकरी करत असताना त्यांनी वडनगरमध्ये घर उभारलं. अब्बास यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा वडनगरच्या कासिम्पा गावात राहतो. तर लहान भाऊ ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत असतो. निवृत्तीनंतर अब्बास आता त्यांच्या लहान मुलाकडे असतात, असं पंकजभाईंनी सांगितलं.

आमची आई अब्बासची खूप काळजी घ्यायची. ईदच्या दिवशी आई अब्बासच्या आवडीचं जेवण करायची. मोहरमच्या दिवशी त्याला काळे कपडे परिधान करण्यास द्यायची. अब्बास माणूस म्हणून खूप चांगला होता. तो पाचवेळा नमाज अदा करायचा. मोठा झाल्यावर त्यानं हज यात्रादेखील केली, असं पंकजभाई म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here