मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी आज राज्यात मतदान होत असून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रंगतदार लढत होणार आहे. कारण या १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्याने एका उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एक-एक मत महत्त्वाचं झालेलं असल्याने दोन्ही बाजूने जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच नातेवाइकाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये गेलेले बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर अखेर मतदानाच्या दिवशी मुंबईत दाखल झाले आहेत.

दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडेही हक्काची पुरेशी मते नाहीत. त्यामुळे या जागेवर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. ही मते मिळविण्यासाठी त्या आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रमुख उमेदवारांनी भेट घेऊन त्यांना बविआच्या तीन मतांसाठी साकडं घातलं आहे. बविआचे आमदार क्षितीज ठाकुर हे नातेवाइकाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये गेले होते. त्यामुळे ते सोमवारी मतदानासाठी उपलब्ध होऊ शकतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र मतदानाला काही तास शिल्लक असताना ते मुंबई पोहोचले आहेत.

विधान परिषदेसाठी आघाडीचे कोट्याचे गणित जुळले; मतदानासाठी आमदारांना महत्त्वाच्या सूचना

रात्री उशिरापर्यंत मतांसाठी खलबतं

विधानपरिषद निवडणुकीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला विविध पक्षांच्या आमदारांना मुंबईत वास्तव्यासाठी आणलेल्या ‘हॉटेल डिप्लोमसी’ला जोर आला होता. भाजप आमदारांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कफ परेडच्या ताज प्रेसिडेन्सीमध्ये कानमंत्र दिला. भाजप या निवडणुकीत कोटा वाढवून न घेता प्रत्येक उमेदवारासाठी असलेले २७चे लक्ष गाठण्याच्या विचारात आहे. शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेल वेस्टइनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस आमदारांना वरळीतील फोर सीझन हॉटेलात काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी मतदानासाठीचे मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरिमन पॉइंटच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये रात्री आठ वाजता परेड घेतली.

दरम्यान, आज सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आमदारांचे मतदान होईल. सायंकाळी ५ वाजल्यापासून विधिमंडळाच्या सातव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. पिंपरी-चिंचवडचे भाजप आ. लक्ष्मण जगताप, पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजप आ. मुक्ता टिळक यांची प्रकृती बरी नाही. पण हे दोघेही आमदार मतदानासाठी येतील, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here