Ajit pawar news: राष्ट्रवादीच्या ३ आमदारांनी पुन्हा धाकधूक वाढवली; अजूनही मुंबईत पोहोचलेच नाहीत! – mlc election ncp’s khed mla dilip mohite patil, pimpri mla anna bansode and kopargaon mla ashutosh kale have not reached mumbai yet
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असतानाच राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. कारण चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असला तरी पक्षाचे तीन आमदार अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत. यामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे हे तीन आमदार मुंबईत पोहोचले नसले तरी ते पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
मतदानाची वेळ संपण्याआधी हे तीनही आमदार मुंबईत पोहोचतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. अण्णा बनसोडे हे प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत, तर आशुतोष काळे हे स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने आतापर्यंत येऊ शकले नसल्याचे समजते. मात्र दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतही हे आमदार मतदानाच्या दिवशी मुंबईत उशिरा पोहोचले होते. त्यामुळे आज ते किती वाजेपर्यंत येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात चांगलीच टक्कर होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप अशा चार प्रमुख पक्षांच्या आमदारांना मुंबईतील विविध ठिकाणच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कसं मतदान करायचं, प्राधान्यक्रम कसा द्यायचा याबाबत या आमदारांना पुन्हा एकदा माहिती देण्यात आली आहे.