भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे विधान परिषदेच्या रिंगणात आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह खडसेंना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. खडसे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. विधान परिषदेकडे रवाना होत असताना खडसेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील, असं खडसे म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर मविआच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवातून बोध घेऊन चुका सुधारू. आता विधान परिषदेच्या निमित्तानं मविआकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत. अनेक वर्षे एकाच पक्षात राहून आम्ही सोबत काम केलं आहे. त्यामुळे आम्ही संपर्कात आहोत. पण आपला पक्ष सोडून ते मला मतदान करतील असं मला वाटत नाहीत, असं खडसे म्हणाले.
बविआ काय करणार?
विधान परिषद निवडणुकीत लहान पक्ष व अपक्ष आमदारांची १५ मतं असून, ती निर्णायक ठरणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांसाठी भाजप, काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांनी त्या पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांनी अद्याप याविषयी काहीही भाष्य केलेलं नाही.
क्षितीज ठाकूर मुंबईत दाखल
बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. ही मते मिळविण्यासाठी त्या आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रमुख उमेदवारांनी भेट घेऊन त्यांना ‘बविआ’च्या तीन मतांसाठी साकडे घातलं. बविआचे आमदार क्षितीज ठाकूर हे नातेवाइकाच्या उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले होते. ते थोड्याच वेळापूर्वी मुंबईत दाखल झाले आहेत.