मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी राज्यात मतदानाला सुरुवात झाली असून सर्वच पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल होऊ लागले आहेत. भाजपकडे चार जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेली मते असताना पाचवा उमेदवारही मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली असून विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या बैठकीनंतर अखेर शिवसेनेनं आपल्या वाट्याची चार मते काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आणून त्यांच्याकडे १० मते शिल्लक राहत आहेत. ती मते आपल्या दुसऱ्या उमेदवारास मिळावीत, अशी मागणी काँग्रेसने केली होती. महाविकास आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेना आपल्या वाट्याची चार मते काँग्रेसला देण्यास तयार झाल्याचं सांगितलं जात आहे.

आदित्य ठाकरेंसह सेना आमदारांची बस ट्रॅफिकमध्ये अडकली, पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी

क्रॉस व्होटिंगची सर्वच पक्षांना भीती

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहा उमेदवारांपैकी प्रत्येकास २८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते. चारही पक्षांनी आमदारांना व्हीप (पक्षादेश) जारी केला आहे. मात्र, गुप्त मतदानपद्धती असल्यामुळे क्रॉस व्होटिंगची सर्व पक्षांना भीती आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्की काय होतं, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here