वडील भास्कर वाघमारे आणि मुलगा साहिल वाघमारे यांनी दहावीची परीक्षा दिली होती. भास्कर वाघमारे ४३ वर्षांचे आहेत. लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती बेतासबात असल्यानं त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. सातवीत असताना त्यांना शाळा सोडावी लागली. त्यानंतर जवळपास ३० वर्षांनंतर त्यांनी शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. यंदा त्यांचा मुलगा साहिल दहावीची परीक्षा देणार असल्यानं भास्कर यांनीही बोर्डाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
‘मला पुढे शिकायचं होतं. पण लहानपणी घरची परिस्थिती चांगली नसल्यानं, कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्यानं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं,’ असं भास्कर वाघमारेंनी सांगितलं. वाघमारे सध्या खासगी नोकरी करतात. शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. माझा मुलगादेखील दहावीची परीक्षा देत असल्यानं मला मदत झाल्याचं वाघमारे म्हणाले.
वाघमारे दररोज अभ्यास करायचे. नोकरी करून आल्यानंतर ते अभ्यासाला लागायचे. आता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद असला, तरी मुलगा नापास झाल्याचं दु:ख असल्याचं वाघमारे सांगतात. मी माझ्या मुलाला मदत करेन. दोन विषयांत तो उत्तीर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साहिल वाघमारेनंदेखील वडिलांप्रमाणे संमिश्र भावना व्यक्त केल्या. वडिलांना दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं. त्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे. मीदेखील लवकरच दोन विषय पूर्ण करून दहावी उत्तीर्ण होईन, असं साहिल म्हणाला.