मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत १०० पेक्षा अधिक आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर निशाणा साधत विजयाचा दावा केला जात आहे. मात्र १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्याने एका उमेदवाराच्या पदरी पराभव पडणार आहे. अशातच भाजप खासदाराने सूचक ट्वीट केलं असून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार असल्याचा दावा केला असून मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार असल्याचं म्हटलं आहे. ‘काळ आला होता भाऊ किंव्हा भाईवर, पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,’ असं ट्वीट अनिल बोंडे यांनी केलं आहे.

अनिल बोंडेंचा इशारा कोणाकडे?

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा दुसरा उमेदवार असलेल्या भाई जगताप यांची जागा धोक्यात असल्याची चर्चा होती. कारण काँग्रेसकडे स्वत:ची ४२ मते असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना अतिरिक्त १० मतांची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे ऊर्फ नाथाभाऊ यांच्या पराभवासाठी रणनीती आखल्याचं बोललं जात होतं. मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आपल्या वाट्याची काही मते त्यांना देणार असल्याची बातमी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवार आमशा पाडवी यांनाच धोका निर्माण होणार असल्याचं अनिल बोंडे यांनी आपल्या ट्वीटमधून सुचवलं आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election LIVE: विधानपरिषद निवडणूक २०२२

भाजपसाठी लढाई आणखी कठीण; काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारासाठी अखेर रणनीती ठरली
दरम्यान, अनिल बोंडे यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर महाविकास आघाडीवर पराभवाची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीत काय निकाल लागतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here