शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडे प्रत्येकी २७ मतांचा कोटा आहे. आज सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर २०३ पेक्षा जास्त आमदारांनी मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार काहीवेळापूर्वीच विधानभवनात मतदानासाठी दाखल झाले. सर्वप्रथम शिवसेनेच्या कोकणातील आमदारांकडून केले जाईल. त्यानंतर शिवसेनेचे उर्वरित आमदार मतदान करतील.
Maharashtra Vidhan Parishad Election LIVE: विधानपरिषद निवडणूक २०२२
मतदानाची रंगीत तालीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांच्या साहाय्याने काल रात्रीपर्यंत विशेष रणनीती आखली. या रणनीतीनुसार, शिवसेना आमदार पाच-पाच जणांच्या बॅचने विधिमंडळात मतदान करण्यासाठी येतील. स्वत: आदित्य ठाकरे प्रत्येक आमदारावर जातीने लक्ष ठेवून आहेत. प्रिफरेन्शिल वोटिंग करताना गडबड होऊ नये, यासाठी आमदारांची विशेष कार्यशाळा घेतलेली असतानाही सेना खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब पुन्हा पुन्हा आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शन करत आहेत.
शिवसेना आमदारांना पवईच्या वेस्ट इन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या मुक्कामात त्यांना विधानपरिषदेला कशाप्रकारे मतदान करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सगळ्याची रंगीत तालीमही हॉटेलमध्ये झाली होती.