हल्लेखोराने अक्षरशः भररस्त्यात या रिक्षावाल्याला लोळवलं आणि त्यानंतर त्याला रस्त्यावरुन फरफटतही नेलं होतं. उल्हासनगरच्या कॅम्प ४ परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरच्या मोरया नगरी रोडवर रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. आशेळेगाव गावदेवी मंदिराजवळ एक रिक्षाचालक रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी रिक्षात बसलेल्या व्यक्तीनेच रिक्षाचालकावर कटरने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने रिक्षावालाही बिथरला.
यानंतर झालेल्या झटापटीमध्ये रिक्षा टेम्पोला जाऊन धडकली. यावेळी हल्लेखोराने रिक्षाचालकाला रिक्षाच्या बाहेर ओढलं आणि त्याला रस्त्यावर लोळवलं. रिक्षा चालकाला रस्त्यावर फरफटत नेल्यानंतर हल्लेखोर एका क्षणात तिथून निघून गेल्याचं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं. रस्त्याच्या मधोमध जखमी रिक्षाचालक विव्हळत होता. यावेळी बघ्यांची गर्दीही झालेली होती. दरम्यान, हल्लेखोरावर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.