मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रेणू शर्मा हिच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. रेणू शर्माकडून खंडणीसाठी सतत होत असलेल्या मागणीमुळे धनंजय मुंडे मानसिक तणावात आले आणि त्यातूनच मुंडे यांना १३ एप्रिल रोजी ब्रेन स्ट्रोक आला, असं या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.

रेणू शर्मा ही धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांची बहीण आहेत. रेणू शर्माने आपल्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. याविरोधात मुंडे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने इंदौरला जाऊन रेणू शर्मा हिला ताब्यात घेऊन अटक केली होती. याप्रकरणी शनिवारी चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे यांच्या आजाराविषयी धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

भाजपला लक्ष्मणभाऊंपेक्षा चांगले नेते कुठून मिळणार? जगतापांच्या पक्षनिष्ठेने फडणवीस भारावले

‘रेणू शर्मा हिच्याकडून पैशासाठी लावण्यात आलेल्या तगाद्यामुळे धनंजय मुंडे तणावात होते. त्यानंतर मुंडे यांना प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव १२ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबतची कागदपत्रे आम्ही ताब्यात घेतली आहेत,’ असंही चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी या रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी इंदौर येथील एका विकासकाचा जबाबही नोंदवला असून यामध्ये त्याने म्हटलं आहे की, रेणू शर्मा हिने फेब्रुवारी महिन्यात ५४ लाख रुपये किंमतीचं एक आलिशान घर खरेदी केलं होतं. तसंच रेणू शर्मा हिच्याकडे कोणतंही उत्पन्नाचं साधन नसताना तिच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचाही आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय, शरद पवारांचे मार्गदर्शन आहे | धनंजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here