पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी येथे मंदिरावर खंडेराव महाराजांचा धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी १८ जून रोजी जितेंद्र ठाकरे हा त्याची पत्नी सासू व सासरे यांच्यासोबत गेला होता. कार्यक्रम आटोपल्यावर सर्व जण भडगाव येथील घरी परतले. याचदरम्यान जितेंद्र याचा त्याची पत्नी व सासू सासऱ्यांसोबत वाद झाला. या वादातून सायंकाळी जितेंद्र हा त्याच्या एका महिन्याच्या मुलीली सोबत घेत शेताच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर एका शेतात त्याने त्या चिमुकलीला विहीरीत फेकून स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. जितेंद्र याचा पाठलाग करत असलेल्या लोकांनी विहिरीतून जितेंद्र यास सुखरुप बाहेर काढले. मात्र, यात त्या एक महिन्याच्या चिमकुली मृत्यू झाला होता.
उपचारादरम्यान रुग्णालयातून फरार झाला होता संशयित बाप
जितेंद्र यास उपचारासाठी भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेप्रकरणी रविवारी जितेंद्र याची पत्नी सविता नाना ठाकरे (भिल) (वय २०, रा. कराब ता. भडगाव) हिच्या फिर्यादीवरुन जितेंद्र विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान जितेंद्र हा रुग्णालयातून पसार झाला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला संशयित जितेंद्र ठाकरे याचा शोध घेवून अटक करण्याच्या सुचना व आदेश दिले होते.
सांगली हादरली! शिक्षक, डॉक्टरसह कुटुंबातील ९ जणांनी एकत्रच आयुष्य संपवलं
फरार बापाला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना फरार झालेला संशयित जितेंद्र ठाकरे हा रविवारी पाचोरा येथे आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक किशोर राठोड, रणजी जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, ईश्वर पाटील यांचे पथकाने रविवारी त्याला अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत. दरम्यान पती पत्नीच्या वादात चिमुकलीचा बळी गेला असून घटनेप्रकरणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.