म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

संचारबंदी असतानाही मॉर्निग वॉकला बाहेर पडलेले पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आर. एस. कुमार यांना पोलिसांनी आज सकाळी रस्त्यावरच परेड करायला लावली. कुमार यांच्यासह निगडी परिसरातील ३५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘मी नियम मोडणार नाही,’ अशी शपथ त्यांना देण्यात आली.

सध्या भाजपमध्ये असलेले माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह ३५ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिक सकाळी मॉर्निग वॉकला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे निगडी पोलिसांनी कालपासून मॉर्निग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. आज देखील आकुर्डी परिसरात कारवाई करण्यात आली.

गुलाबी मास्क घातलेले माजी महापौर आहेत

आकुर्डी परिसरात मॉर्निग वॉकला बाहेर पडलेल्या नागरिकांकडून पोलिसांनी सूर्यनमस्कार करून घेतले. त्याचबरोबर ”मी आदेश पाळत नाही, कारण मी उच्चशिक्षित दीडशहाणा आहे’, ‘गो करोना’, ‘मी स्वार्थी आहे, मी करोना फैलावण्यास मदत करत आहे, मी मॉर्निग वॉकर’ ‘मी अतिशहाणा आहे, ‘मी मॉर्निग वॉकला चाललो आहे गो कोरोना’, ‘मी गाढव आहे, मला सांगितलेले कळत नाही’ असा मजकूर असलेले फलक हातामध्ये देऊन ‘मी नियम मोडणार नाही’ अशी शपथ सर्वांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यासाठी पोलिसांना सहकार्य केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here