मुंबई: कणखर वडिल, प्रेमळ काका किंवा हसवणारे आजोबा… कोणतीही भूमिका समरसून करणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे प्रेक्षकांचे आवडते आहेत. अरुण नलावडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी भाषेसंदर्भात भाष्य केलं. मराठी भाषा जपायची असेल तर त्याची सुरुवात घरातून करायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी भाषा, भाषेची सक्ती आणि मुलांचं शिक्षण अशा अनेक विषयांवर अरुण नलावडे यांनी सकाळ वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं मत व्यक्त केलं. मराठी भाषेबद्दल बोलतना अरुण नलावडे यांनी आपल्या घरातच अनेक गोष्टी चुकीच्या केल्या जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली. आपली मराठी भाषा जपायची असले तर त्याची सुरुवात घरातून व्हायला हवी. एका वर्षाच्या मुलासोबत आई-वडिल इंग्रजीत बोलायला सुरुवात करत असतील, तर आपली मराठी भाषा कशी टिकणार? घरात लहान मुलांना मराठी शिकवायला पाहिजे. त्यांना कोणती भाषा आवडते , कोणती आवडत नाही, हे आपण कसं ठरवणार?, असंही नलावडे म्हणाले.
‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात, पण तिथे प्राजक्ता माळी कुणाला करतेय मिस?
घरातच मुलांना इंग्रजी शिकवली जाते. हाऊ आर यू, सॉरी असं आपणच बोलत असू तर ते आपल्याकडून हेच शिकणार आहेत. शाळेत कोणती भाषा शिकवली जाणार हे नंतरच, पण घरी कोणती भाषा आपण बोलतो,ते महत्त्वाचं असतं. भाषा टिकण्यासंदर्भात आपण सरकारला बोल लावतो, पण आपणही यासाठी पुढाकार घ्यायला’, असं अरुण नलावडे म्हणाले.

अरुण नलावडे यांच्या कामबद्दल बोलायचं झालं तर ते सध्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ते या मालिकेत देशपांडे सरांची भूमिका साकारत आहेत.

मालिकांच्या टीआरपीवर बोलताना नलावडे म्हणाले होते की, टीआरपी म्हणजे काय हेच इतक्या वर्षांत मला कधी कळलं नाही. मी त्यात पडतही नाही. मी करत असलेली एक मालिका याच कारणास्तव बंद झाली होती. पण, त्याबद्दलची वाहिन्यांची गणितं वेगळी असतात. ग्रामीण, शहरी प्रेक्षक असं वर्गीकरण केलं जातं. विशिष्ट भागांत विशिष्ट मालिका बघण्याची कारणं वेगळी असतात. असे सगळे निकष लावले जातात. त्यामुळे कोणतीही वाहिनी या सगळ्याचा व्यावसायिकदृष्ट्या विचार करते. पण, टीआरपीमुळे दर्जात्मक मालिका चिरडली जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा आहे. हल्ली अनेक सीरिजमधून जे दाखवलं जातं ते बघून असं वाटू लागलंय की समाजात चांगलं, पवित्र असं काही आहे की नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here