सेलू रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास डेमो गाडी दाखल झाल्यानंतर एक मुलगी गाडीजवळ चकरा मारत होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास नाटककर पोलीस कर्मचारी परसराम सूर्यवंशी यांच्या सदरील बाब लक्षात आली त्यामुळे मुलीला विचारपूस करून पोलीस चौकीमध्ये घेऊन जाऊन विचारपूस केली असता आर्थिक परिस्थितीमुळे घरच्यांनी दहावी पुढील शिक्षणासाठी विरोध केल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी आपण या ठिकाणी आले असल्याचे मुलीने सांगितले.
त्यामुळे, पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना रेल्वेस्थानकावर बोलवून घेतले यावेळी माजी नगरसेवक मनीष कदम व त्यांच्या सोबत काही जण त्याठिकाणी आले. सर्वांनी मुलीची समजूत काढून शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची तयारी दर्शवली. त्यानंतर मुलीला तिच्या आईकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.