मुंबई: तब्बल दोन तासांच्या विलंबाने विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद ठरवण्यात आले आहे. ही दोन्ही मतं बाद करण्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींमध्ये खडाजंगी झाली. या दोन्ही मतपत्रिकांद्वारे रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्यात आले होते. मात्र, रामराजेंच्या मतपत्रिकेवर खाडाखोड असल्याने त्यावर भाजपचे पोलिंग एजंट असलेल्या आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला होता. ही मतपत्रिका बाद ठरवण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता मतमोजणीच्या ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडीत वाद रंगला आहे.

त्यानंतर महाविकास आघाडीने भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतला. छाननी केल्यानंतर हे मतदेखील बाद ठरवण्यात आले. त्यामुळे आता भाजप आणि महाविकास आघाडीच्या कोट्यातील प्रत्येकी एक-एक मत बाद ठरले आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान झाले. या काळात २८५ आमदारांना मतदानाचा हक्क बजावला. रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील मत बाद ठरल्यास वैध मतांची संख्या २८३ इतकी होईल. त्यामुळे उमेदवाराला जिंकण्यासाठीचा मतांचा कोटा कमी होऊ शकतो.

LIVE: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अखेर दोन तासांनंतर सुरुवात

ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांचे प्रयत्न, अपक्षांच्या भेटीगाठी सुरु होत्या, तर आमदार फुटू नये यासाठीही संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही त्यांचे उमेदवार निवडून येण्याचा दावा केला होता.
प्रसाद लाड यांना किती मतं मिळणार? दरेकरांची थेट मविआमधील राज्यमंत्र्यांशी पैज
सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला भाजप आमदार हरिभाऊ बागडेंनी पहिलं मतदान केलं. यावेळी भाजपने राज्यसभेपेक्षा वेगळी रणनीती आखली होती. भाजपने मतदान लवकरात लवकर पूर्ण करण्याची स्ट्रॅटेजी ठरवली होती. तर काँग्रेस आणि शिवसेनेनेही वेळेपूर्वीच मतदान आटोपलं. यावेळी राष्ट्रवादीचे तीन आमदार हे मुंबईत न पोहोचल्याने अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, दुपारच्या सुमारास ते मतदानाला आले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची परवानगी मिळवण्यासाठीही प्रयत्न केले मात्र सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here