विधानपरिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल साधारण सोमवारी रात्री ११ वाजता स्पष्ट झाला. त्यानंतर पहाटे एक वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर शिवसेना नेते बैठकीसाठी दाखल झाले आहेत. काहीवेळापूर्वीच अनिल परब आणि अनिल देसाई हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. वर्षा बंगल्यावरून हे दोन्ही नेते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शिवसेनेचीही जवळपास तीन मतं फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे हे दगाबाज आमदार कोण, याविषयी बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच या पराभवामुळे महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यालाच धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी या बैठकीत रणनीती निश्चित केली जाऊ शकते.
वर्षा बंगल्यावरही ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे. कारण, या बैठकीनंतर मंगळवारी सकाळी लगेचच शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत स्वत: उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकार धोक्यात?
भाजपने राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी १० जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपला पहिल्या पसंतीची एकूण १३३ मतं मिळाली आहेत. भाजप आणि त्यांच्या गोटातील लहान पक्ष व अपक्षांचे कागदावरील एकूण संख्याबळ हे ११३ इतके आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत भाजपने १३३ मतं मिळवल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ हा जादुई आकडा आहे. या आकड्यापासून भाजप आता केवळ ११ मतांनी दूर आहे. त्यामुळे ही महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या एकूण ५५ मतांच्या कोट्यांपैकी फक्त ५२ मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेची तीन मतं फुटल्याचे सांगितले जात आहे. तर काँग्रेसकडे एकूण ४४ आमदार होते. मात्र, काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मिळून एकूण ४१ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचीही तीन मतं फुटल्याचे निष्पन्न झाले आहे.