मुंबई: राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेत भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या आमदारांच्या संख्येत मोठं अंतर आहे. मात्र तरीही दोन्ही निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूंचे सारखेच उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि मविआचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाले. तर विधान परिषदेच्या एकूण १० जागांपैकी प्रत्येकी ५ जागा भाजप आणि मविआला मिळाल्या. मविआइतकं संख्याबळ नसतानाही त्यांना तोडीसतोड कामगिरी भाजपनं केली. त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं आणि अचूक नियोजन आहे, हे नाकारता येत नाही.

मतांच्या कोट्याचं अचूक नियोजन
राज्यसभा निवडणूक असो वा विधान परिषद, देवेंद्र फडणवीस यांनी मतांच्या कोट्याचं नियोजन केलं. मविआच्या तुलनेत भाजपकडे असलेल्या आमदारांची संख्या कमी आहे. मात्र तरीही पसंतीक्रम आणि इतर नियमांचा अचूक अभ्यास करून फडणवीस यांनी भाजपला यश मिळवून दिलं.
विधान परिषद निवडणूकीतही महाविकास आघाडीला धक्का देत भाजपचा पुन्हा ‘मत’चमत्कार
अपक्ष, छोट्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क
भाजप आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षांची संख्या ११५ च्या वर जात नाही. मात्र तरीही भाजपनं राज्यसभेच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची १२३ आणि विधान परिषदेत १३४ मतं मिळवली. फडणवीसांचा अपक्ष आणि लहान पक्षांशी असलेला संपर्क उत्तम आहे. हाच संपर्क त्यांच्या कामी आला.

मविआ समर्थकांची मतं फोडण्यात यश
राज्यसभा निवडणुकीत भाजपनं अपक्ष, लहान पक्षांची मतं फोडली. त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत तर चक्क शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या दोन प्रमुख पक्षांची मतं फुटणं अधिक गंभीर आहे. फडणवीसांनी ते करून दाखवलं आहे. याचा अर्थ सरकारमधील नाराजी त्यांनी हेरली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटली?; मतकोट्यांचे आदेश पाळले नसल्याची चर्चा
बविआची मतं मिळवण्यात यश
बहुजन विकास आघाडीची ३ मतं मिळवण्यात भाजपला यश आलं. विशेष म्हणजे राज्यात सत्ता नसतानाही त्यांनी ही किमया करून दाखवली. मविआचे अनेक बडे नेते बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरारची वारी करून आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ठाकूर यांच्याशी उत्तम संबंध आहेत. मात्र तरीही बविआची मतं भाजपला मिळाली.

पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांचं नियोजन
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे चार उमेदवार निवडून येणार हे नक्की होतं. मात्र पाचवे उमेदवार असलेल्या प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपचं एकही मत नव्हतं. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांसाठी लाड यांची मदार अपक्ष आणि लहान पक्षांवर होती. त्या मतांचं नियोजन फडणवीस यांनी अतिशय चोख केलं. फडणवीस यांनी दाखवलेलं हे कौशल्य, लहान पक्षांशी त्यांचे असलेले उत्तम संबंध मविआची डोकेदुखी वाढवणारे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here