मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या रंगतदार लढतीत भाजपने पाच जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपकडे केवळ चार जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेली हक्काची मते होती. मात्र प्रसाद लाड यांच्या रूपाने भाजपने पाचवा उमेदवारही निवडून आणण्याचा करिष्मा करून दाखवला आहे. भाजपच्या या विजयात अपक्ष आमदार आणि राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या फुटलेल्या मतांचे योगदान असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसला आपली मते राखता आलेली नसताना राष्ट्रवादीने मात्र अतिरिक्त सात मते मिळवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले होते. मात्र पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे संख्याबळ ५३ इतके झाले. त्यानंतर पक्षाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात जावे लागल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही. परिणामी विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे स्वत:ची केवळ ५१ मते होती. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोघांना मिळून ५७ मते मिळाली. तसंच रामराजे निंबाळकर यांच्या वाट्याचे एक मत भाजपच्या आक्षेपामुळे बाद झाले. याचा अर्थ राष्ट्रवादीने ७ मते अधिकची मिळवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

विधान परिषद निवडणूकीतही महाविकास आघाडीला धक्का देत भाजपचा पुन्हा ‘मत’चमत्कार

राष्ट्रवादीने कशी केली कमाल?

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती होती. त्यांच्या पक्षाची ५१ मते असताना त्यांच्या दोन उमेदवारांना ५७ मते मिळाली. यामागे प्रामुख्याने अजित पवार यांच्या जवळ असलेले अपक्ष, तसेच सपा व एमआयएमच्या मतदारांची त्यांना साथ मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांचा आमदारांवर किती मोठा प्रभाव आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं. दुसरीकडे, भाजपमधील माझ्या काही मित्रांनी मला मदत केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमधीलही काही मते खेचण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधानपरिषद निवडणुकीत कोणते १० उमेदवार जिंकले?

राज्यात १० जागांसाठी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड असे पाचही उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे, शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी तर राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे दोन्ही उमेदवार निवडून आणले. मात्र, काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला असून दुसरे उमेदवार भाई जगताप यांनी विजय खेचून आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here