राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआला धक्का बसला आहे. भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होत असताना काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची अस्वस्थता बाहेर आली आहे.

हायलाइट्स:
- विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव
- हंडोरेंच्या पराभवामुळे काँग्रेस नेते अस्वस्थ
- सत्तेत राहून काय मिळतंय? नसीम खान यांचा सवाल
महाविकास आघाडीत राहून आम्हाला काय मिळतंय, असा सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते नसीम खान यांनी विचारला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालेलं आहे. आमचे उमेदवार असलेल्या चंद्रकांत हंडोरे यांना दुसऱ्या पसंतीची मतंदेखील मिळाली नाहीत. हंडोरे यांची निवड काँग्रेस नेतृत्त्वानं केली होती. ते आमचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांचा पराभव दुर्दैवी आणि गंभीर असल्याचं खान म्हणाले.
महाविकास आघाडीचं सरकार येऊन अडीच वर्षे झाली आहेत. या सरकारमध्ये राहायला हवं का की वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडी स्थापन होत असताना किमान समान कार्यक्रम निश्चित झाला होता. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याची, विस्तार करण्याची मुभा होती. पण तसं घडतंय का, असा सवाल खान यांनी उपस्थित केला.
चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना मिळून पहिल्या पसंतीची एकूण ४१ मतं मिळाली. विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार असताना पक्षाच्या उमेदवारांना ४१ मतं मिळाली. त्यामुळे ३ मतं फुटली हे उघड आहे. यावरूनही खान यांनी नाराजी व्यक्त केली. फ्लोअर मॅनेजमेंटची जबाबदारी असणाऱ्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे. आमचा पहिल्या पसंतीचा उमेदवार पडतो, ही जबाबदारी सगळ्यांची आहे. या परिस्थितीचं अवलोकन नेतृत्त्व करेल, असंदेखील खान म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : congress should rethink about maha vikas aghadi says naseem khan after vidhan parishad election
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network