विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. तसेच विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १३४ मतं मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. भाजपकडे स्वत:चे १०६ आणि ७ अपक्ष आमदार धरून ११३ इतके संख्याबळ आहे. मात्र, विधानपरिषदेचा निकाल पाहता भाजपने महाविकास आघाडीची तब्बल २१ मतं फोडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे समर्थक आमदारांचा सहभाग असू शकतो. कालपर्यंत शिवसेनेची तीन मतं फुटल्याची चर्चा होती. मात्र, आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, हा आकडा १२ च्या घरात आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यास ठाकरे सरकार धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील किती आमदार त्यांच्यासोबत येतात, हे पाहावे लागेल. सध्या शिवसेनेचे १३ आमदार त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जाते. मात्र, हा आकडा आणखी वाढू शकतो. मात्र, शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार बाहेर पडल्याशिवाय त्यांना स्वतंत्रपणे गट स्थापन करून कोणत्याही इतर पक्षाला पाठिंबा देता येणार नाही. अन्यथा त्यांच्यावर पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मात्र, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन पाहता त्यांच्यासोबत पक्षातील आमदारांचा मोठा गट जाण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीकडे काल १५० आमदारांचे पाठबळ होते. सरकार स्थापनेसाठीचा बहुमताचा आकडा हा १४४ च्या घरात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे १३ आमदार फोडल्यास संपूर्ण पक्ष आणि महाविकास आघाडीच खिळखिळी होईल. तसे घडल्यास ठाकरे सरकार पडणार, यात तिळमात्र शंका नाही, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये?
विधानपरिषद निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळपासून शिवसेनेचे नाराज आमदार गायब आहेत. पक्षाकडून त्यांना संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अजूनही हे आमदार मुंबईतील कोणत्याही शिवसेना नेत्याच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे नेमके गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच मंत्री शिंदे यांनी काही नाराज आमदारांसह थेट गुजरात गाठल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांचा मुक्काम गुजरातमधील एका हॉटेलमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.