शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे तब्बल १३ आमदार नॉट रिचेबल आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. या पराभवाची जबाबदारी मी घेतो, असं थोरात काल म्हणाले होते. आता थोरात काँग्रेसच्या गटनेतेपदावरून पायउतार होण्याच्या मनस्थितीत असल्याचं समजतं.
विधानसभेत काँग्रेसचे एकूण ४४ आमदार आहेत. मात्र काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची ४१ मतं मिळाली. त्यामुळे काँग्रेसची ३ मतं फुटल्याचं उघड झालं. काँग्रेसनं शिवसेनेकडे पहिल्या पसंतीची ४ मतं मागितली होती. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसला मदत केली नाही का, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला. त्यावर आमच्याच पक्षाची मतं फुटली, तर इतरांना काय दोष देणार, असं म्हणत थोरातांनी नाराजी व्यक्त केली होती.
काँग्रेस नेते, आमदार दिल्लीला जाणार
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार आज दिल्लीला जाणार आहे. विधान परिषदेतील पराभवानंतर काँग्रेस नेते पक्ष नेतृत्त्वाची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. आता सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागेल, अशी भूमिका काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली होती. थोरात यांचं विधान अतिशय सूचक मानलं जात आहे.