मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तब्बल २० आमदार फोडून भाजपने ठाकरे सरकारला धक्का दिला होता. त्यानंतर काही तासांमध्येच शिवसेनेच्या गोटात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आणि सामर्थ्यशाली नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या तब्बल १३ आमदारांना घेऊन सध्या सूरतमधील एका हॉटेलमध्ये जाऊन बसले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे हाडवैरी नारायण राणे यांनी ट्विट करून भाष्य केले आहे.

नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमधून एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये गेल्यास तो शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल. मात्र, पक्षांतरबंदीच्या कायद्यामुळे या सर्वांची आमदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळे ही शक्यता सध्याच्या घडीला धुसर वाटत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे सध्या शिवसेना नेतृत्त्वाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेने पुन्हा भाजसोबत युती करावी, तर एकनाथ शिंदे समर्थकांचा गट शिवसेनेत राहील, असा प्रस्ताव शिवसेना नेतृत्त्वासमोर मांडला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बापरे! शिवसेनेचे १३ नव्हे जास्त आमदार फुटणार? आता ‘या’ आमदाराच्या व्हॉटसअ‍ॅप डीपीवर एकनाथ शिंदेंचा फोटो
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार पक्षातून बाहेर पडण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांना पक्षाबाहेर जाऊन देण्याची जोखमी पत्कारणार का, हे आता पाहावे लागेल. मात्र, भाजपसाठी एकनाथ शिंदे यांच्यासारख तगडा नेता पक्षात येणे खूपच फायदेशीर ठरेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. काल संध्याकाळी विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर हे सर्वजण गुजरातच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here