Amit shah BJP: मोठी बातमी : आता अमित शहा ‘अॅक्शन मोड’मध्ये; शिवसेना आमदारांची भेट घेण्याची शक्यता – big news: now bjp leader amit shah in ‘action mode’; possibility to meet shiv sena mlas
मुंबई : शिवसेनेचे २० पेक्षा अधिक आमदार गायब असल्याने पक्ष फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना आमदार नाराज असल्याने त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवरही होणार असून सरकारच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सर्व आमदारांची भेट घेतील, अशी माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी २० ते २५ आमदारांसोबत थेट गुजरातला जाण्याचा निर्णय घेतल्याने ते राजकीयदृष्ट्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतच असल्याचं स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर ते आपल्या समर्थक आमदारांसह राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्या बाबींमध्ये पक्षांतरबंदी कायदा आडवा येऊ शकतो. त्यामुळे त्यातून कसा मार्ग काढायचा, याबाबत अमित शहा यांच्याकडून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी चर्चा केली जाऊ शकते.
दरम्यान, शिवसेनेत आतापर्यंत ठाकरे कुटुंबाचा शब्द अंतिम मानला जात असे. मात्र एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांची मोट बांधत पक्षनेतृत्वाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे नेमकी काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.