मुंबई :शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाविरोधात बंड करून सुरतला गेलेल्या एका शिवसेना आमदाराची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सुरतमध्ये दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नितीन देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेना अ‍ॅक्शनमध्ये; शिंदे समर्थक आमदारांना हॉटेलमधून उचललं, गाडीत टाकलं अन् थेट ‘वर्षा’वर नेलं

कोण आहेत नितीन देशमुख?

महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार आहे. देशमुख हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत, ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख यांचे भाजपच्याही काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मागील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख यांनी भाजपला मदत केली, असा आरोप शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी केला होता.

अकोल्यातील शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मोठा वाद आहे. मागील काही महिन्यांपूर्वी एका ‘लेटरबॉम्ब’ने या आरोप-प्रत्यारोपांच्या दुसऱ्या अंकाला सुरूवात झाली होती. शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपला मदत करत असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला होता. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने नेमणुका करण्याची मागणीही पक्षनेतृत्वाकडे करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here