आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्ही शिवसेनेतच आहोत, अशी भूमिका शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच सरकार आम्हाला मान्य नाही. या दोन पक्षांसोबतचा घरोबा आम्हाला नको, अशी थेट भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसेनेनं अडीच वर्षांपूर्वा भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरला. तो निर्णय सेनेच्या काही आमदारांना पटला नव्हता. या आमदारांची नाराजी आता उफाळून आली आहे.
बंड न केलेले आमदारदेखील नाराज
एकनाथ शिंदे यांच्यासोबत नसलेले आमदारदेखील नाराज असल्याचं कळतं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची वर्षावर बैठक बोलावली आहे. शिंदे यांच्यासोबत न गेलेले आमदारही काँग्रेस, राष्ट्रवादीवर नाराज आहेत. आपली नाराजी ते उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत व्यक्त करू शकतात.
विदर्भातील शिवसेना नेते नाराज
विदर्भातील शिवसेनेचे नेते काँग्रेससोबतच्या घरोब्यामुळे नाराज आहेत. विदर्भ काही वर्षांपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यावेळी अनेकांनी याठिकाणी शिवसेना रुजवली, वाढवली. काँग्रेससोबत संघर्ष करत सेनेच्या नेत्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं. मात्र आता त्याच काँग्रेस नेत्यांसोबत सेना नेत्यांना जुळवून घ्यावं लागत आहे. ही बाब त्यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे.
निधीवरूनही नाराजी
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत स्थापन केलेल्या सरकारमध्ये शिवसेनेला म्हणावं तितकं महत्त्व मिळत नाही. अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे शिवसेना आमदारांना, मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नाही. बराचसा निधी राष्ट्रवादीलाच मिळतो, अशी भूमिका सेनेच्या नाराज आमदारांची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अडीच वर्षे सत्तेत आहोत. झाला तितका संसार पुरे झाला. त्यांच्यासोबत आणखी घरोबा नको, असा पवित्रा सेनेच्या आमदारांनी घेतला आहे.