या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजल देशमुख यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. काल संध्याकाळी सहा वाजता माझे त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले. मी थोड्याचवेळात मुंबईहून अकोल्याला येण्यासाठी निघेन, असे त्यांनी मला फोनवर सांगितले. मात्र, सात वाजल्यपासून त्यांचा फोन बंद आहे. त्यांचा पीए आणि सहकारी स्टेशनवर त्यांची वाट बघत होते. मात्र, ते विधानभवनातून परत आलेच नाहीत. कालपासून माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे मी अकोला शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी त्यांना तातडीने शोधावे, असे प्रांजल देशमुख यांनी सांगितले.
पहाटेच्या सुमारास नितीन देशमुख यांना सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.
कोण आहेत नितीन देशमुख?
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार आहे. देशमुख हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत, ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख यांचे भाजपच्याही काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मागील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख यांनी भाजपला मदत केली, असा आरोप शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी केला होता.
अकोल्यातील शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मोठा वाद आहे. मागील काही महिन्यांपूर्वी एका ‘लेटरबॉम्ब’ने या आरोप-प्रत्यारोपांच्या दुसऱ्या अंकाला सुरूवात झाली होती. शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपला मदत करत असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला होता. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने नेमणुका करण्याची मागणीही पक्षनेतृत्वाकडे करण्यात आली होती.