eknath shinde news: राजकीय भूकंप घडत असताना ठाकरे सरकारच्या यंत्रणेकडून मोठी चूक? महत्त्वाची माहिती उघड – big mistake by thackeray government’s intelligence? in front of important information
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहाव्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांसह बंड करत पक्षनेतृत्वाला आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर झाल्याचं दिसत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळीच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह मुंबई सोडून निघून गेले. मात्र इतक्या मोठ्या घटनेचा सरकारमधील कोणालाच थांगपत्ता कसा लागला नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
राज्यात सरकार अस्थिर करण्यासाठी किंवा सत्ता उलथवण्यासाठी काही प्रयत्न तर सुरू नाहीत ना, यावर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून असते. अशा काही हालचाली दिसल्यास या यंत्रणेकडून राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना तशी माहिती दिली जाते. मात्र जवळपास २० आमदारांसह शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून सुरतला गेले तरी शिवसेना नेतृत्व याबाबत काही तास अनभिज्ञच होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. Maharashtra Politics: एकनाथ शिंदे भेटीसाठी आणि चर्चेसाठी तयार; उद्धव ठाकरेंचे २ शिलेदार सुरतकडे रवाना
ही पहिलीच घटना नाही…
राज्यातील गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची गेल्या अडीच वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे, असंही नाही. काही दिवसांपूर्वीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं होतं. शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळखले जातात. याच पवार यांच्या राजधानी मुंबईतील निवासस्थानी हल्ला झाल्यानंतर आधी माध्यमांचे कॅमेरे पोहोचले आणि त्यानंतर पोलीस दाखल झाले. तेव्हाही गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत २० नव्हे तर तब्बल ३५ आमदार असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातील अस्वस्थता आणखीनच वाढली असून उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाटी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.