सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या लिंक रोड परिसरात संजीवनगरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह असल्याचे निदान दोन दिवसापूर्वी झाले होते. त्यामुळे या महिलेच्या संपर्कातील काही निकटवर्तीयांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. तसेच या सर्वांना उपचारासाठी महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यापैकी चौघांचे अहवाल शनिवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली असून, जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७३ झाली आहे.
‘तो’ रुग्ण होतोय बरा!
यापूर्वी गोविंदनगर, रोड, आनंदवली आणि पौर्णिमा बस थांब्याजवळील समाज कल्याण वसतिगृहातील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. गोविंदनगर येथील बाधित रुग्णाचा १४ दिवसांनी पाठविलेला स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हा रुग्ण बरा होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times