मुंबई: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. काहीवेळापूर्वीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्याजागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना अपहरण करुन त्याठिकाणी नेण्यात आले आहे. या सर्व आमदारांना गुजरात पोलीस आणि केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आले आहे. अनेक आमदारांनी हॉटेलमधून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याविरुद्ध दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्याविरोधात कठोर कारवाई करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ठाकरे सरकार पडलं तर भाजपसोबत जाणार का? शरद पवारांनी थेट उत्तर दिलं
अशाप्रकारचं वादळ हे शिवसेनेच्या आयुष्यात काही पहिल्यांदाच आलेले नाही. या सगळ्यातून शिवसेना पुन्हा उठून उभी राहिले आहे. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत. त्यांच्या मनात नाराजी असेल तर त्यांनी मुंबईला येऊन चर्चा करावी. सुरतला जाऊन त्यांच्याशी चर्चा करणे, हे पक्षशिस्तीत बसणारे नाही, असे राऊत यांनी सांगितले.

‘आमदारांना पोटनिवडणुका नकोत, ते घाबरले आहेत’

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या अनेक आमदारांनी आमच्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपर्क साधला आहे. हे सर्व आमदार सध्या प्रचंड घाबरले आहेत. त्यांना राज्यात पोटनिवडणुकीला सामोरे जायचे नाही. आमदारांनी स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यावा, असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला शिवसेनेचे फक्त १४ आमदार उपस्थित होते. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून त्यांना ५३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here