विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाचा उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे मविआला धक्का बसला. शिवसेनेचे २१ आमदार नॉट रिचेबल आहेत. यानंतर आता काँग्रेसचे ५ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजतं.

हायलाइट्स:
- शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे आमदार नॉट रिचेबल
- काँग्रेसच्या ५ आमदारांशी संपर्क होईना
- महाविकास आघाडी सरकार संकटात
शिवसेनेचे २१ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. यातले काही जण ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर काँग्रेसनं धसका घेतला आहे. काँग्रेसनं आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. त्यासाठी सगळ्या आमदारांशी संपर्क साधण्यात आला. मात्र ५ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजतं. त्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार झटका बसताना दिसत आहे.
काल विधान परिषेदची निवडणूक झाली. मतदानापूर्वी काँग्रेस आमदार फोर सीझन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. मतदानानंतर बरेसचे आमदार त्यांच्या मतदारसंघात परत गेले. मात्र शिवसेनेत बंड झाल्यानंतर दक्षतेचा भाग म्हणून काँग्रेसनं आपल्या आमदारांना मुंबई गाठण्याच्या सूचना केल्या. मात्र ५ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजलं.
काँग्रेसची ३ मतं फुटली; हंडोरे पराभूत
विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होती. मात्र हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. विशेष म्हणजे हंडोरे काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. हंडोरे यांच्या पराभवाचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले.
चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना मिळून पहिल्या पसंतीची एकूण ४१ मतं मिळाली. विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार असताना पक्षाच्या उमेदवारांना ४१ मतं मिळाली. त्यामुळे ३ मतं फुटली हे उघड आहे. काँग्रेसमधील नाराजी यातून दिसून आली आहे. आज काँग्रेसचे नेते आणि आमदार दिल्लीला जाणार होते. मात्र सेनेत झालेलं बंड पाहता काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्ली वारी स्थगित केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network