या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या धार्मिक गुरुंनी एक भाकित वर्तविले आहे. राज्यातील २२ आमदार फुटतील आणि राज्यात लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जामनगर सौराष्ट्र येथील जगद्गुरू सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज हे एकनाथ शिंदे यांचे गुरु आहेत. आज सकाळपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात सत्तापालट होणार असल्याचे भाकीत वर्तविले.
एकनाथ शिंदे हे सोमवारी संध्याकाळी विधानपरिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या दिशेने रवाना झाले होते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह आलेल्या आमदारांचा मुक्काम सध्या सुरत येथील ली मेरेडियन हॉटेलमध्ये आहे. आता लवकरच एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर कृष्णदेवनंद यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वाटचालीसंदर्भात भाष्य केले. भाजपाचे सरकार यावे आणि सर्व आमदार सुरक्षित राहावे यासाठी श्री त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी अभिषेक केला त्यानुसार आपण अभिषेक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांची भेट
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर संवाद घडवून आणला. या दोघांमध्ये तब्बल १५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. मी शिवसेनेतून बाहेर पडलो नव्हतो, वेगळा गटही स्थापन केला नव्हता, मग माझ्यावर कारवाई का करण्यात आली? माझ्याकडून शिवसेनेचे गटनेतेपद का काढून घेण्यात आले?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचे समजते. तसेच आता मी माझी पुढील भूमिका अधिकृतपणे जाहीर करेन, असेही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे समजते.