विधान परिषद निवडणूक संपल्यावर साहेबांनी आपल्याला जेवायला बोलाविले आहे, असं सांगून आमदार कैलास पाटील यांना एका खासगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले. ठाण्यापासून सुमारे ४० किमी पुढे गाडी गेल्यानंतर काहीतरी गडबड आहे, हे कैलास पाटील यांच्या लक्षात आलं. मात्र जसंही आपली दिशाभूल केली गेलीय, असं त्यांना कळालं. त्याच क्षणी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत त्यांना हुलकवणी दिली.
मला लघुशंकेला थांबायचं आहे, असं त्यांनी गाडीच्या ड्रायव्हराला सांगितलं. त्यानंतर ते गाडीतून उतरले. अंधाराचा फायदा घेऊन ते तिथून पसार झाले. जीव धोक्यात घालून कैलास पाटील यांनी संबंधित सर्वांनाच गुंगारा देत रात्रीच्या अंधारात गुजरात महाराष्ट्र बॉर्डर जवळीत एका अज्ञात ठिकाणाहून भर पावसात 4 किमी पायी आले. त्यानंतर मिळेल त्या गाडीने त्यांनी मुंबई गाठली. पायी चालत, तसेच त्यानंतर दुचाकीवर एका व्यक्तीकडून त्यांनी लिफ्ट घेतली. आणि नंतर ट्रकने दहिसरला पोहोचले. कैलास पाटील यांनी रातोरात मुंबई गाठली. खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेतृत्वाला सांगितला.
आमदार कैलास पाटील हे शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार झाले आहेत. त्यांची पक्ष निष्ठा पाहून शिवसेनेने त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. कालच्या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झालेल्या असताना कैलास पाटील यांनी फितुर न होता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे शिवसेना नेते त्यांचं कौतुक करत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांनी सेना आमदारांमध्ये जान भरली
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जरी २० ते २५ आमदार गेलेले असले तरी बाकी ३० आमदार मुंबईतच आहेत. याच आमदारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. माझं एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन बोलणं झालंय. आमच्या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. ते माझं नक्की ऐकतील. काही तासांत ते आपल्या सगळ्यासोबत असतील, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काळजीत असलेल्या सेना आमदारांमध्ये जान भरली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरुनच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. जवळपास १५ ते २० मिनिटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या संवादानंतर मुख्यमंत्र्यांनी सेना आमदारांशी संवाद साधला. तुम्ही डगमगू नका. काळजी करु नका. माझं भाईंशी बोलणं झालंय. ते माझं ऐकतील. काही तासांत ते आपल्या सगळ्यांसोबत असतील, असा विश्वास त्यांनी सेना आमदारांना दिला.