एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी हादरली आहे. कालपर्यंत शिवसेनेकडू पक्षाचे बहुतांश आमदार आमच्यासोबतच राहतील, असे सांगितले जात होते. मात्र, आज सकाळी एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीत पोहोचले आहेत. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही समावेश आहे. या आमदारांसोबत एकनाथ शिंदे वेगळा गट स्थापन करून विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता आता कैकपटीने वाढली आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला किती मंत्री उपस्थित राहतात, हे पाहावे लागेल. या बैठकीअंती उद्धव ठाकरे एखाद मोठा राजकीय निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘आम्हाला बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जायचं आहे’
गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला कोणावरही टीकाटिप्पणी करायची नसल्याचे सांगितले. पण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जायचे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. गुवाहाटीत एकनाथ शिंदे गटाचे आमदार किती दिवस राहणार आणि पुढे काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. सूरत मुंबईपासून जवळ असल्यामुळे एकनाथ शिंदे कोणताही धोका पत्कारायला तयार नाहीत. त्यामुळे आता या सर्व आमदारांना गुवाहाटीत नेऊन शिवसेनेसाठी हे सर्वजण जवळपास नॉट रिचेबल कसे राहतील, याची व्यवस्था करण्यात आली आहे.