गुवाहाटी: आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत, अशा शब्दांत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील राजकारणाचे संकेत दिले आहेत. आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही. शिवसैनिकांनी कोणतंही बंड केलेलं नाही. आम्ही पक्षाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आसामच्या गुवाहाटीत पोहोचले आहेत.
बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणार! एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले; स्पष्ट अन् थेट बोलले
विधान परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर शिंदे आणि त्यांचा समर्थक गट सूरतला रवाना झाला. सुरतमुक्कामी असलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके किती आमदार आहेत, याबाबत मंगळवारी सकाळपासून विविध आकडे सांगितले जात होते. कुणी १३… कुणी २०… कुणी ३०… अशी ती आकडेवारी होती. मात्र, खुद्द एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत वृत्तवाहिन्यांशी बोलताना, ‘माझ्यासोबत ४० शिवसेनेचे आमदार आहेत,’ असा दावा केला. ५५ आमदारसंख्या असलेल्या शिवसेनेतील ४० आमदार शिंदे यांच्यासोबत खरोखरच असतील, तर शिवसेनेपुढे अभूतपूर्व असा राजकीय व तांत्रिक पेच निर्माण होईल, हे स्पष्ट आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका फोटोत शिंदे मध्यभागी बसले आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला सेना आमदार बसले आहेत. मागच्या रांगेत बरेच आमदार उभे आहेत. या फोटोत जवळपास ३५ ते ४० आमदार आहेत. पक्षातून दोन तृतीयांश आमदार बाहेर पडल्यास त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचा भंग होत नाही.

एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं समजतं. शिंदे समर्थक आमदार एका व्हिडीओमध्ये काही कागदपत्रांवर सह्या करताना दिसत आहेत. त्यामुळे वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिंदे आणि त्यांच्या आमदारांसोबत भाजप नेते मोहित कंबोज, संजय कुटे, रविंद्र चव्हाण असल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रदीप जयस्वाल, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव, प्रहारचे आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल दिसत आहेत. यशवंत जाधव गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहेत. ईडीची कारवाई झाल्यानं तुम्ही हे पाऊल उचललं का, असा सवाल माध्यमांनी यामिनी जाधव यांना विचारला. त्यावर तसं काही नाही, असं उत्तर जाधव यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here