आमदारांना मारहाण आणि हृदयविकाराचा झटका
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांबाबत ‘सामना’च्या अग्रलेखातून गंभीर आरोप करण्यात आला आहे. ‘सोमवारी विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना ‘उचलून’ गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले व भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून ‘ऑपरेशन कमळ’वाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे?’ असा संतप्त सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
दरम्यान, ‘विधान परिषदेतील दहाव्या जागेचा विजय भाजपने मिळवला तो शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणाऱ्या लोकांना बेइमान करून. या निवडणुकीत काँगेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पाडून भाजपने विजय मिळवला. हंडोरे हे मुंबईतील दीन-दलित समाजाचे नेते आहेत. अशा दीन-दलितास पाडून भाजपने बेइमानांच्या मतांवर विजयोत्सव साजरा केला. त्याच बेइमानांना लगेच गुजरातच्या भूमीवर नेऊन जोरदार सरबराई सुरू झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर व आमशा पाडवी विजयी झाले, पण त्यांच्या अधिकृत मतांतही घाटा दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले, पण मतांची फाटाफूट घडवून भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे,’ असा घणाघातही ‘सामना’तून करण्यात आला आहे.