सध्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३३ आमदार आहेत. आज सेनेचे आणखी ३-४ आमदार येतील. सध्या अपक्षांना धरून हॉटेलमध्ये ३६ आमदार आहेत. काँग्रेसचे काही आमदार संपर्कात आहेत. मात्र त्यांची नावं सांगू शकत नाही. लवकरच आमदारांचा आकडा ५० पर्यंत जाईल. पुढच्या ३ ते ४ दिवसांत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती कडू यांनी दिली.
आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याची सुरुवात सूरतमध्येच झाली. महाविकास आघाडी सरकार येत असताना आम्ही शिवसेनेला समर्थन दिलं. माझी कोणावरही व्यक्तीगत नाराजी नाही. मात्र शिवसेनेचे ७५ टक्के आमदार शिंदे यांच्यासोबत असल्यानं मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं कडू यांनी सांगितलं.
गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र अनेक शिवसेना आमदारांच्या निधीसंदर्भात तक्रारी आहेत. त्यांच्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं होतं. पण ते दिलं गेलं नाही. भाजपमधील काही नेते आमच्या संपर्कात आहेत. थोड्याच वेळात शिंदे सर्व आमदारांची एक बैठक घेणार आहेत, अशी माहिती कडू यांनी दिली.
सध्या ४० आमदार हॉटेलमध्ये; सेना आमदार संजय शिरसाठ यांचा दावा
सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार आहेत. अपक्षांना धरून हा आकडा ४० च्या घरात जातो. आणखी काही आमदार संपर्कात आहेत. ते आल्यावर आकडा ४६ पर्यंत जाईल, अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी दिली. शिरसाठ शिंदे यांच्यासोबत हॉटेल रॅडिसनवर आहेत.
आमची पक्ष नेतृत्त्वावर कोणतीही नाराजी नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीवर नाराज आहोत. आमच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार येणार आहेत, त्याची माहिती मी देऊ शकत नाही. तितका तपशील देण्याचा अधिकार मला नाही, असं शिरसाठ म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांना जबरदस्तीनं नेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. राऊतांचा आरोप संजय यांनी फेटाळला. अहो, ते आमदार आहेत. त्यांना मारून मुटकून, डांबून कसं काय ठेवता येईल? सगळेजण आपल्या मर्जीनं इथे आले आहेत. कोणावरही दबाव नाही. संजय राऊत काय बोलतात, त्यांना माहिती कुठून मिळते, देवच जाणे, असं शिरसाठ म्हणाले.
बच्चू कडू ते प्रताप सरनाईक; शिंदेंसोबतचे आमदार पाहून तुमच्याही भुवया उंचावतील