कमलनाथ यांच्यावरच का दिली जबाबदारी?
शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर राज्यात मंगळवार सकाळपासून बैठकांचा जोर वाढला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पक्षश्रेष्ठी आणि आमदारांची खलबते सुरू असतानाच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीसुद्धा याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर मंगळवारी दुपारीच अखिल भारतीय काँग्रेस समितीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थती हातळण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर सोपवली.
कमलनाथ हे गांधी कुटुंबीयांच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींपैकी एक असे व्यक्तिमत्त्व आहे. काँग्रेसच्या कठीण काळात गांधी परिवाराच्या पाठीशी ते कायम उभे राहिले आहेत. त्यामुळेच काँग्रेसने महाराष्ट्राची जबाबदारी कमलनाथ यांच्या खांद्यावर सोपवली आहे. कमलनाथ आज, बुधवारी मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते सर्व आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या पराभवाबाबतही चर्चा केली जाईल, असे बोलले जात आहे.