मुंबई : शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केलेले राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दूर होऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची मागणी आहे. ही मागणी करत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविषयीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. मात्र माझा शिंदे यांच्यासोबत चांगला संवाद सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपविरोधात हल्लाबोल
‘शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडींमुळे जर कोणाला आनंदाचं भरतं आला असेल की शिवसेनेत काही होतंय तर असं नाही. ते सगळे शिवसैनिक, त्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे. काही गैरसमज आहेत, ते दूर होतील. जर भाजपला असं वाटत असेल या निमित्ताने ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, तर शिवसेनेत राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.