शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे आता बिकट प्रसंगातून ते मार्ग काढून ठाकरे सरकार वाचवणार का, हे पाहावे लागेल. तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थतेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या आमदारांची फाटाफूट होऊ नये म्हणून आता पक्षाचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यातील या नाराजीनाट्याचा काँग्रेस पक्षाला विशेष करून महाविकास आघाडीला फटका बसू नये याची जबाबदारी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर सोपवली आहे. कमलनाथ हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांना अशाप्रकारचे राजकीय पेच असलेली परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे. कमलनाथ हे सध्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर थांबले आहेत. या तिन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडी एखादा मोठा निर्णय घेते का, हे पाहावे लागेल.
शिवसेनेच्या आमदारांची बैठक
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर आपल्याकडे ४० आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला होता. तसेच आणखी १० आमदार दुपारपर्यंत आपल्याला येऊन मिळतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने दुपारी पाच वाजता वर्षा बंगल्यावर आपल्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल.