देवेंद्र फडणवीस: ठाकरे सरकार धोक्यात येताच फडणवीसांच्या निवासस्थानी वेगवान हालचाली; बड्या नेत्यांसह बैठक सुरू – thackeray government collapse the meeting of bjp leaders starts at the residence of devendra fadnavis
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांसह पक्षाविरोधात केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी राजीनामा देतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तसे संकेतही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी भाजप नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आणि आमदार गिरीज महाजन यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळल्यास सत्तास्थापनेसाठी नेमकी कशी रणनीती आखायची, याबाबत भाजप नेत्यांच्या बैठकीत खलबतं होत असल्याची माहिती आहे. आम्ही शिवसेनेसोबत! एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक रस्त्यावर, औरंगाबादमध्ये निदर्शने
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५५ पैकी ४० पेक्षा अधिक आमदारांना स्वत:कडे खेचण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे शिंदे हे लवकरच आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपला समर्थन देतील अशी चिन्हे आहेत. परिणामी उद्धव ठाकरे यांना फार काळ मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवणं कठीण असल्याचं दिसत आहे.
संजय राऊत यांनी काय संकेत दिले?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं आपले आमदार पुन्हा पक्षाकडे येतील, ही आशा सोडल्याचं स्पष्ट होत आहे.