माझ्या दंडावर बळजबरी इंजेक्शन टोचले!
हर्ट अॅटॅक आलेला नव्हता, मला अॅटॅक आला हे धादांत खोटं
मला हर्ट अॅटॅक आलेला नव्हता, मला अॅटॅक आला हे धादांत खोटं आहे. माझी तब्येत बरी आहे. मी तुमच्यासमोर चांगल्या स्थितीत उभा आहे. काल तिथल्या लोकांनी रुग्णालायत नेलं. तुमच्यावर कारवाई करायची होती. माझा बी.पी. वाढला नव्हता. रुग्णालयात नेल्यावर माझ्या दंडामध्ये चुकीच्या पद्धतीनं इंजेक्शन टोचण्यात आले. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे आमचे मंत्री होते पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं असल्याचं नितीन देशमुख म्हणाले.
राऊतांचा ‘तो’ दावा खरा ठरला!
नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत सूरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी दुपारी आली होती. मात्र, नितीन देशमुखांना सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला होता. मुंबईतून त्यांचे अपहरण केले गेले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलिसांनी आणि गुंडांनी बेदम मारहाण केली. मुंबईतील गुंड देखील तेथे आहेत, असं सांगत गुजरातच्या भूमीवर हिंसा कशी?, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.
कोण आहेत नितीन देशमुख?
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार आहे. देशमुख हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत, ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख यांचे भाजपच्याही काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मागील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख यांनी भाजपला मदत केली, असा आरोप शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी केला होता.
अकोल्यातील शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मोठा वाद आहे. मागील काही महिन्यांपूर्वी एका ‘लेटरबॉम्ब’ने या आरोप-प्रत्यारोपांच्या दुसऱ्या अंकाला सुरूवात झाली होती. शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपला मदत करत असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला होता. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने नेमणुका करण्याची मागणीही पक्षनेतृत्वाकडे करण्यात आली होती.