शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. या पत्रात बुधवारी दुपारी पाच वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना आमदरांना देण्यात आल्या आहेत. राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.
या बैठकीला उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे, असे ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवेसनेच्या बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे. यावर आता एकनाथ शिंदे गटातील आमदार काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
निष्ठेच्या अग्नीपरीक्षेत कोण उत्तीर्ण होतंय, हे लवकरच समजेल: संजय राऊत
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांबाबत भाष्य केले आहे. जोपर्यंत शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येत नाहीत तोपर्यंत मत व्यक्त करता येणार नाही. या सगळ्या प्रकरणातून शिवसेना तावुनसुलाखून बाहेर पडेल. निष्ठेच्या अग्नीपरीक्षेत किती जण उत्तीर्ण होतात, हे भविष्यात समजेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.