२०२१ पर्यंतचे सगळे राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत उरलेलं नाही. त्यामुळे ही कॅबिनेट बैठक ठाकरे सरकारची कॅबिनेट बैठक ठरू शकते. त्यामुळे भविष्यात अडचणी नकोत यासाठी ठाकरे सरकारनं राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. कोरोनाची लागण झाली असल्यानं त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं टळलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बैठकीला अनुपस्थित होते. शिवसेनेचे तीनच मंत्री बैठकीला उपस्थित होते. उर्वरित मंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत आहेत. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे सगळे मंत्री उपस्थित होते.
शिंदेंची भूमिका काय?
बाळासाहेबांचे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. सध्या ४६ आमदार सोबत असून हा आकडा आणखी वाढेल, असा दावा शिंदेंनी केला. शिवसेनेची विचारधारा हिंदुत्त्वाची आहे. बाळासाहेबांना पक्षाला आणि आम्हाला हिंदुत्त्वाचा विचार दिला. त्यांनी दाखवलेल्या मार्गानंच आम्ही पुढे चाललो आहोत. आम्ही बंड केलेलं नाही, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले.
कोणतीच अट ठेवली नाही
भाजपसोबत जाण्याची अट तुम्ही शिवसेना नेतृत्त्वापुढे ठेवली का, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर मी कोणतीच अट ठेवलेली नाही, असं उत्तर शिंदेंनी दिलं. हिंदुत्त्व हीच पक्षाची विचारधारा आहे. शिवसैनिकांची, आमच्या मतदारांची हीच भावना आहे. ती घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्त्वाशी एकनिष्ठ आहेत. ते कधीही हिंदुत्त्वाशी तडतोड करणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
…अन् शिंदेंनी फोनच कट केला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी संवाद झाला का, त्यातून काही मार्ग निघाला का, तुमच्या गटाचं नेमकं काय ठरलंय, असे प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर रश्मी वहिनींशी संवाद सुरूच असतो. आमची भूमिका आमदारांच्या बैठकीनंतर जाहीर करेन, असं उत्तर शिंदेंनी दिलं. तुम्ही अजूनही उद्धव ठाकरेंना तुमचे नेते मानता का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शिंदे यांनी फोन कट केला.