मुंबई- शिवसेनेचे निष्ठावंत, पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते, राज्य सरकारमध्ये नगर विकासासह अनेक महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. अशात आता मोठ्या पडद्यावर एकनाथ शिंदे साकारलेल्या अभिनेता क्षितीश दाते याच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर साऱ्यांचं लक्ष वेधलं.


काय आहे इन्स्टा स्टोरीमध्ये

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं शिवसेनेसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. अशात मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ सिनेमातून ज्याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली त्या अभिनेत्याची इन्स्टा स्टोरीही सध्या चर्चेत आहे. क्षितीशने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर करून लिहिले की, ‘मोठी राजकीय उलाढाल सुरू असताना चेष्टेत मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं वेगळं. हे असं छापणं चुकीचं आहे.’

क्षितीश दाते

कोण आहे क्षितीश दाते

क्षितीश हा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता असून अनेक नाटक, वेब सीरिज आणि सिनेमांमधून त्याने आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. नुकत्याच आलेल्या सरसेनापती हंबीरराव सिनेमातही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र ‘धर्मवीर’ सिनेमामुळे तो विशेष प्रकाशझोतात आला. हुबेहूब एकनाथ शिंदे साकारल्यामुळे त्याचे अनेक पातळीवर कौतुकही झाले.


इतर कलाकारांनीही दिल्या सद्यस्थितीवर प्रतिक्रिया

दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेल्या या राजकीय नाट्यावर इतर मराठी कलाकारांनीही भाष्य केलं आहे. यात प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता आरोह वेलणकर यांनीही आपली मतं व्यक्त केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here