अलिबाग: करोनाने दक्षिण रायगडमध्ये शिरकाव केला असून श्रीवर्धननंतर आज पोलादपूरमध्येही करोनाचा रुग्ण आढळला. पोलादपुरातील एका महिलेला कारोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यावासीय चिंताग्रस्त बनले आहेत.

पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम या लोकवस्तीमध्ये असलेल्या एका वृद्ध जोडप्यापैकी ६२ वर्षीय महिलेला तीन दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. तिथे या महिलेची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम या भागात सदर महिलेचे घर असून हा परिसर सील करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे.

सदर महिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी महाड शहरातील आदित्य नर्सिंग होम या खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. तेथील डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर सरकारी यंत्रणेची मदत घेवून तिला कस्तुरबा रुग्णालयात हलविले. तेथे तिच्या मुलाने भांडुप (मुंबई) येथील निवासस्थानाचा पत्ता दिल्याने पोलादपूरमधून रवाना झालेल्या महिलेबाबत अधिक माहिती मिळण्यात उशीर होत आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तिच्या संपर्कात कुटुंबातील नवरा, मुलगा, सून तसेच रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफ आला आहे.

२८ दिवसांसाठी परिसर सील

पोलादपूर तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. २- हनुमाननगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, पोलादपूर, प्रभाग क्र.५ – बौद्धवाडी, भैरवनाथनगर (पश्चिमेकडील भाग), प्रभाग क्र. ६- प्रभातनगर, जाखमाता नगर, गोकुळनगर, सैनिकनगर व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. पोलादपूरमधील महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी एक आदेश काढून प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here