CM Uddhav Thackeray Leaves Varsha Bungalow : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भावनिक साद देत वर्षा निवासस्थान सोडत ‘मातोश्री’वर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडणार हे ऐकताच ‘वर्षा’ ते ‘मातोश्री’च्या दरम्यानच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, आवाज कुणाच… शिवसेनेचा या घोषणांनी हा परिसर दुमदुमला. सोशल मीडियावरही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भावनिक वातावरण निर्माण झालेय. सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडतानाचा फरक सांगण्यात येतोय. नेटकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णायाचं कौतुक करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. 

‘भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहून मुख्यमंत्री निवास सोडणारे, आणि फुलांची उधळण अंगावर झेलत वर्षा निवासस्थान सोडणारे उद्धव ठाकरे फरक नक्की आहे. उद्धव ठाकरे यांचं पुढं काय होईल नाही माहीत पण ते सध्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मात्र आहेत..’ असा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहे. ट्विटर, फेसबूक, व्हॉट्स अॅप स्टेट्सवर हा मेसेज दिसत आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर भिंतीवर उद्धव ठाकरेंबद्दल लिहिलेला मजकूर सध्या व्हायरल झाला होता. त्यावेळी वर्षा बंगल्यातील खोलीतील भींतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहल्याचं समोर आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. ‘साधारण 15 दिवसांपूर्वीच आम्ही बंगला सोडला. त्यावेळी कोपरा न् कोपरा पाहिला होता. तेव्हा असे काहीही लिहिलेले आढळले नव्हते. दिविजाने तर असे काही लिहिण्याचा प्रश्नच नाही. यावरून होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. आमची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थान सोडलं आणि ‘मातोश्री’कडे निघाले. उद्धव ठाकरे ‘वर्षा’मधून बाहेर आल्यावर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उद्धव ठाकरे हे वर्षावरून बाहेर येताना लोकांनी एकच गर्दी केली. लोकांनी एवढी गर्दी केली होती की उद्धव ठाकरेंना त्यांच्या गाडीपर्यंतही पोहोचता येत नव्हतं. त्यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत होते. यावेळी लोकांनी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास शिवसैनिकांनी दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here