औरंगाबाद: योग्य उपचारानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली सात वर्षीय चिमुकली करोनामुक्त झाली आहे. तिला ३ एप्रिल रोजी करोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने, खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ४ एप्रिल रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर यशस्वी उपचारामुळे चिमुकली शनिवारी करोनामुक्त झाली. त्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयातून औरंगाबादेतील पहिली करोना रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी गेली आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. तिच्यावर बालरोगतज्ज्ञ, चेस्ट फिजिशियन यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. चिमुकलीसोबत तिचे आई-वडील रात्रंदिवस तिथेच राहून तिची काळजी घेत रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांना मदत करत होते. विलगीकरण काळात त्या मुलीच्या उपचारानंतर तीन स्वॅब फेरतपासणीसाठी पाठविण्यात आले व ते तीनही अहवाल निगेटीव्ह आले. सरकारकडून प्राप्त सूचनेनुसार व निर्देशानुसार या चिमुकलीचा १४ व १५ व्या दिवसाचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तिला शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times